Tuesday, November 29, 2011

जुनी मैत्रीण


ब्रम्हकमळ उमलावे काळोख्या अंधारात,
सुवास पसरावा त्याजचा मंद,सर्वदूर असा....
अगदी तशीच एखादी जुनी मैत्रीण भेटते,
अचानक,
आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर ती सांजवेळ,कधी सरते????

तोच जुना सुगंध,फक्त नवीन बाटली त्याला;
नात्यांची,कपड्यांची,वेळेप्रमाणे येणार्‍या भावांची...
मनात मात्र काहूर उठत माझ्या;
कारण सुगंध जुनाच असतो भावनांचा....

आदर,प्रेम,भावनांची गर्दी उचंबळते,
मग मनातल्या वादळाच्या शमण्याची वाट पाहत बसतो,दोघेही....
एकत्र नाही म्हणून तेंव्हाचा राग,द्वेष कधीच लोप पावलेला;
आता फक्त दुरून एकमेकांना दिलेल्या स्मितहास्यात,सर्व कथा सामावलेली....

एखादा कटाक्ष,नजर सगळे सांगून जाते;
त्याला साथ असते ती संथ पण शीतल वाहणार्‍या नदीसारख्या हास्याची....
पाऊल चुकीच्या दिशेने नाही पडलेले,हे पाहून मन समाधानाने भरून येत....
आपण मात्र अजूनही त्याच चक्रात अडकलेले हा विचार क्षणभरासाठी मी विसरतो...
किती छान वाटत,जेंव्हा अशी अचानकपणे एखादी जुनी मैत्रीण भेटते......