Friday, February 14, 2014

लालबुंद निखारे आणि राखेत उधळलेली स्वप्नं !!!

पायाखाली निखारेच असतात आपल्या, सतत;
कल्पना असो वा नसो,
आपण धुंडाळतो त्यातच आपला रस्ता...
कधी कोणाचे निखारे विझतात,
मार्ग सुकर बनतो; जळण्याचे व्रण आपण विसरतो.
काळाचं रामबाण औषध त्यावर उपायकारक ठरतं.
काहींना मात्र त्या निखाऱ्यातून जाळच जाणवतो,
इच्छा नसतानाही भाजण्यापलीकडे दुसरा पर्याय नसतो…   ।।

रांगत,भेकत कसेबसे उभे राहतो आपण.
जळलेल्या हाताची व्यथा, करपलेल्या पायांना त्याचं काय अप्रूप वाटणार??
दाहकता सत्याची त्या निखाऱ्यात अजून प्रपात घडवते;
समाजाच्या चाली-रूढींवर हल्ला करता-करता, आपण लुळे पडतो.
कोणी उभं राहतं, त्या निखाऱ्यानवर.
मात्र त्यांची संख्याच इतकी नगण्य असते, की विझलेले निखारे जास्त असावेत,       त्यांच्याच आयुष्यातले.
ते पिच्छा सोडत नाहीत, निखारे मात्र जळत राहतात.
वणवा पेटतो लागलीच, क्रांतीची आग होरपळून काढते, दोघांना.
जीव मात्र फक्त त्यांचा जातो, कारण निखाऱ्यांच काम जळण्याचच असतं… ।।

जे जळतात, ते फक्त निखारे नसतात;
शरीरं भाजली जातात, मनं करपतात.
नियतीच्या या खेळामध्ये माणूस फक्त भरडला नाही जात,
तर त्याचा चोथा होतो, निर्जळी.
कारण आयुष्याला पोषक असा ओलावा तर निखाऱ्यानीच गिळलेला असतो…
करपलेली मनं मग निखाऱ्यांवर तेल नाही ओतत,
उलट ती आपल्याच जखमांवर मीठ चोळतात.
प्रश्न विचारतात स्वतःला, समाजाला, निखाऱ्यांना.
मात्र उत्तरांची अपेक्षा न करता.
शेवटी करपलेलीच मनं ती,
त्यांच्या जळण्याचा दुर्गंध पसरतो हळूहळू.
आणि त्याच्यातच त्या मनांचा गुदमरून मृत्यू होतो… ।।

जळलेल्या निखाऱ्यांची, करपून कुजलेल्या मनांची,भाजलेल्या शरीरांची;
केवळ राख उरते.….
त्या राखेतून आक्रोश ऐकायला मिळेल तुम्हाला, अगदी हजारो वर्षांनंतर सुद्धा.
कैक व्यक्तिमत्वं, अगणित स्वनं यांची उडालेली धूळ-धाण तुम्हाला कशी दिसणार???
पिचलेल्या मनांची, शून्यात हरवलेल्या असंख्य नजरांची गोष्ट तुम्हाला कोण सांगणार???
निखारे पूर्ण विझले काय अथवा पाण्याने विझवले गेले काय,
शिल्लक राहते ती फक्त राख… ।।

त्याच राखेत मिळतील तुम्हाला उधळलेली स्वप्नं,
कधी स्वतःच्या हातांनी तर कधी कोणाच्या डोळ्यासमोर, दुसऱ्यांनी…
त्या राखेतच तुम्हाला मिळेल जीवनाचं सार,
ती राख कोणाच्या हाती लागतच नाही……पण……
कारण तिची चातकाप्रमाणे वाट पाहणारे वा तिचा अखंड आयुष्य  शोध घेणारे,
त्याआधीच तिच्यात खितपत पडलेले असतात..
लालबुंद निखाऱ्यांवर चालून,
स्वतःची स्वप्नं त्या राखेत उधळत……  ।।




No comments:

Post a Comment